NEET पेपर घोटाळा: शिक्षण व्यवस्थेपलीकडचे सामाजिक अध:पतन

 NEET पेपर घोटाळा: शिक्षण व्यवस्थेपलीकडचे सामाजिक अध:पतन 

नुकतेच घडलेले NEET पेपर (राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा, NEET - National Eligibility cum Entrance Test) प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण वरवर पाहता केवळ शैक्षणिक घोटाळा वाटत असले, तरी ते एवढे उथळ नसून भारतीय समाजाच्या मानसिक, सामाजिक आणि नैतिक अध:पतनाचे गंभीर प्रतीक आहे. मला वाटते की हा घोटाळा घडण्यामागे खालील गोष्टी मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत.



जीवघेणी स्पर्धा:
राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा इतकी तीव्र आणि जीवघेणी झाली आहे की विद्यार्थी, विशेषतः पालक, मुलांच्या “उज्ज्वल भविष्यासाठी” न्याय, प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता बाजूला ठेवून कोणतीही मर्यादा ओलांडण्यास तयार झाले आहेत.
(आधार - या घोटाळ्यात विद्यार्थी तसेच पालक पण सहभागी आहेत)

सामाजिक प्रतिष्ठेची भूक:
“माझा मुलगा / मुलगी NEET पास झाली, आता डॉक्टर होणार, इंजिनिअर होणार, IIT मध्ये जाणार” हे वाक्य समाजात अभिमानाने सांगता यावे, नातेवाईकांमध्ये मान वाढावा आणि प्रतिष्ठा टिकून राहावी यासाठी अनेकजण नैतिकतेशी तडजोड करण्यासही मागेपुढे पाहत नाहीयेत.
(आधार- या घोटाळ्यात विद्यार्थी तसेच पालक पण सहभागी आहेत)

मोह, माया आणि पैशाचे आकर्षण:
समाजात इतकी प्रचंड मोह-माया आणि भौतिक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत की श्रीमंत असो वा गरीब, इच्छांवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले आहे. त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसा आवश्यक आहे; पण प्रामाणिक मार्गाने कमावलेला पैसा अपुरा पडत असल्याने अनेकजण आपल्या परीने चुकीचे मार्ग स्वीकारत आहेत. त्याचे उदाहरण म्हणजे NEET पेपर लीकसारखे प्रकार, जे अधिक पैसा कमावण्याचे साधन बनत आहेत.
(आधार- या अनैतिक कृत्यात जात, पात, धर्म, पंथ, लिंग यापलीकडे जाऊन काही प्राध्यापक आणि सिस्टीममधील घटकही सहभागी असल्याचे दिसते.)

इगो आणि तुलना संस्कृती:
माणसाचा अहंकार इतका वाढला आहे की इतरांपेक्षा पुढे राहणे हीच गरज बनली आहे. मागे पडल्यावर समाजाकडून होणारी तुलना, अपमान, कमीपणा आणि मान-सन्मानातील फरक लोकांना असह्य वाटू लागला आहे. त्यामुळे “कुठल्याही मार्गाने जिंकायचे” ही मानसिकता वाढत आहे.
(आधार- या अनैतिक कृत्यात गरीब, श्रीमंत, सामान्य-असामान्य अशा सर्व स्तरांतील लोक सहभागी असल्याचे दिसून येते.)

पैसाच सर्व समस्यांचे उत्तर ही मानसिकता:
आज समाजात पुन्हा पुन्हा हेच उदाहरण दिसत आहे की अनेक गोष्टी प्रेमाने, समजावून सांगून, शिक्षणाने, तत्त्वज्ञानाने किंवा शक्तीनेही नियंत्रित होत नाहीत; त्या फक्त पैशाने नियंत्रित केल्या जातात 
आणि हे करण्यातच खरा आनंद आणि सुख आहे असे वाटत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात “सर्व समस्यांचे अंतिम उत्तर म्हणजे पैसा” ही धोकादायक मानसिकता अधिक घट्ट होत चालली आहे.

(आधार- या अनैतिक कृत्यात पेपर घेऊन परीक्षा देणारे आणि पेपर फोडणारे या दोघांचाही अंतिम उद्देश पैसा आणि वैयक्तिक लाभ हाच असल्याचे दिसते.)

सिस्टीमवरील उडालेला विश्वास:
लोकांचा व्यवस्थेवरील विश्वास ढासळत चालला आहे. “कोणीही प्रामाणिक नाही, प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ पाहतो; त्यामुळे आता फक्त मलाच स्वतःला वाचवावे लागेल” ही भावना वाढत आहे. आणि त्या स्वतःच्या बचावासाठी किंवा यशासाठी लोक कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ठेवू लागले आहेत.
(आधार- न्यायप्रक्रिया आणि व्यवस्थेवरील कमी झालेला विश्वासही अशा कृत्यांना प्रेरणा देत असल्याचे दिसून येते.)

 टीप - NEET पेपर घोटाळ्याची बातमी वाचून नैतिकतेचे धडे गिरवणारे, नावे ठेवणारे, नाके मुरडणारे आणि प्रमाद घालणारे बहुतांश (म्हणजे जवळ जवळ सर्वच ) यांच्यात आणि आरोपितांमध्ये एवढाच फरक आहे की, यांना ती संधी मिळाली नाही.

Comments