माइंड युअर लँग्वेज
माइंड युअर लँग्वेज
मराठी भाषेमध्ये एक सुविचार आहे 'शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरा'. समर्थ रामदास म्हणतात, शब्द आणि शस्त्र या दोन्ही शब्दांमध्ये पहिला "श" समान आहे. कारण, शस्त्राच्या घावानं माणूस एकदाच मरतो आणि शब्दाच्या घावानं रोज मरत राहतो.
संत ज्ञानेश्वर म्हणतात, ज्ञान देणारा शब्द तरंगांपेक्षा शक्तिशाली आहे, संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने| शब्दांचीच शस्त्रे यत्न करू | शब्दे वाटू धन जनलोका| तुका म्हणे पाहा शब्दची हा देव| शब्देची गौरव पूजा करू I
जुन्या हिंदी चित्रपटात "माइंड युअर लँग्वेज मिस्टर" असा डायलॉग आपण अभिनेत्री म्हणतांना पाहिला असेलच, असा शब्दांचा महिमा थोर आहे. त्यामुळेच कि काय आता सर्वोच्च न्यायालयाने "माइंड युअर लँग्वेज" असे सर्वांना म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने लिंगसामानतेच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकतांना लिंगभेद दर्शविणाऱ्या काही प्रचलित शब्दांना पर्यायी शब्द देऊन मागच्या आठवड्यात म्हणजे बुधवारी दिनांक १६ ऑगस्ट रोजी एक हस्तपुस्तिका प्रसिद्ध केली आहे. या हस्तपुस्तिकेमध्ये लिंगभेद दर्शविणाऱ्या जुन्या शब्दांना काही नवे पर्यायी शब्द दिले आहेत. पाच न्यायाधीशांचे खंडपीठ ३७० वे कलम रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी एकत्र जमले होते त्या वेळी या हस्तपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
अनादिकाळापासून आपल्या संस्कृतीमध्ये स्त्रीला मातेचा, देवतेचा दर्जा दिलेला असला तरी याच संस्कृतीच्या काळातून तिला चांडाळ, चेटकीण, रंडकी, चुडेल, नासकी, पांढऱ्या पायाची, सटवी, रखेल अशी दूषणे निर्माण झालेली आहेत किंवा आपल्या समाजव्यवस्थेने दिली आहेत.
अशी वापरलेली शब्द (दूषणे) आपली एखादया व्यक्तीबद्दल विशिष्ठ धारणा बनवू शकतात किंवा बनवतातच असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाने काही स्त्री दूषण वाचक शब्द बदलवून त्याजागी अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारे शब्द दिले आहेत.
पूर्वी छेडछाडीला इंग्रजीमध्ये "इव्ह टीजिंग" असा शब्द वापरला जात होता, त्याऐवजी आता रस्त्यावरील लैंगिक छळ (स्ट्रीट सेक्शुअल हऱ्यासमेन्ट) असा शब्द वापरल्या जाईल.
गृहिणींसाठी 'हाऊसवाइफ' संज्ञा वापरली जायची त्याऐवजी आता 'होममेकर' हा शब्द वापरला जाणार आहे.
वेश्येला प्रॉस्टिट्यूट असे म्हटले जायचे आता त्याऐवजी 'सेक्स वर्कर' असा शब्द वापरण्यात येईल.
अफेअर या शब्दाऐवजी 'विवाहबाह्य संबंध' तर बिनलग्नाची आई किंवा लग्न न करता आई झालेली आहे ला आता फक्त “आई” असा शब्द दिला आहे.
चाईल्ड प्रॉस्टिट्यूट ऐवजी आता 'तस्करी झालेले मुलं' हा शब्द वापरण्यात येईल.
बास्टर्ड या शब्दाऐवजी आता 'अविवाहितांचे मूल' असा शब्द वापरण्यात येईल.
उत्तेजक कपडे ऐवजी केवळ कपडे आणि रखेल या शब्दाऐवजी आता 'लग्नाशिवाय सोबती' असा शब्द वापरण्यात येईल.
व्यवसायिक (करिअर) स्त्री, पतित स्त्री, विश्वासू किंवा आज्ञाधारक पत्नी, इव्ह-टीझिंग, हर्माफ्रोडाईट(नपुंसकवृत्ती किंवा द्विलिंगी मानव) सर्वोच्च न्यायालयाने ही वाक्ये, लिंग-अन्यायकारक संज्ञा म्हणून संबोधली आहेत जी भारतीय न्यायालयांमध्ये अनेकदा ऐकली जातात. म्हणून या सर्व शब्दाऐवजी केवळ “स्त्री” हा शब्द वापरण्याचा संकल्प बुधवारी प्रसिद्ध झालेल्या नवीन हँडबुकमध्ये न्यायालयाने केला आहे.
सामान्यतः ओळखल्या गेलेल्या स्टिरियोटाइपपैकी (रूढीवादी)एक म्हणजे स्त्रिया अति भावनिक, अतार्किक आणि निर्णय घेऊ शकत नाहीत ही कल्पना आहे. वस्तुस्थिती अशी आहे की व्यक्तीचे लिंग त्यांच्या तर्कशुद्ध विचारांच्या क्षमतेवर निर्धारीत नसते किंवा प्रभाव पाडत नाही, असे हँडबुक म्हणते आणि ते अगदी सत्य आहे.
हँडबुक मध्ये पुढे असे म्हटले आहे कि, अशी दूषणे स्त्रीच्या अभिव्यक्ती निवडींवर आधारित असलेल्या स्त्रीच्या चारित्र्याबद्दलच्या गृहितकांचा संदर्भ देते, जसे की तिने परिधान केलेले कपडे आणि तिचा लैंगिक इतिहास. अशा गृहितकांमुळे लैंगिक हिंसाचाराचा समावेश असलेल्या प्रकरणात तिच्या कृती आणि विधानांच्या न्यायिक मूल्यांकनावर परिणाम होऊ शकतो.
उदाहणार्थ, एखादया स्त्रीने लैंगिक छळाचा खटला दाखल केलेला असेल तर कोर्टात तिचा लैंगिक इतिहास दाखवून तिला खोटे ठरवले जाते किंवा ते लैंगिक संबंधांमधील संमतीचे महत्त्व कमी करतात. यामुळेच न्यायपालिका आणि कायदेशीर समुदायाला न्याय, आदेश आणि न्यायालयीन याचिकांमध्ये लैंगिक रूढीवादी भाषेच्या यांत्रिक वापरापासून मुक्त करणे हेच या हँडबुक लिहिण्यामागील उद्दिष्ट्ये आहे असे न्यायालय म्हणते.
या बुक बद्दल बोलतांना सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले कि, “महिलांच्या स्टिरियोटाइपवर अवलंबून राहणे हे स्त्रियांसाठी लागू केलेल्या कायद्याचा विपर्यास करण्यासाठी जबाबदार आहे. जरी स्टिरियोटाइपचा वापर एखाद्या प्रकरणाचा निकाल बदलत नाही, तरीही स्टिरियोटीपिकल (रूढीवादी) भाषा आपल्या संवैधानिक आचारसंहितेच्या विरुद्ध कल्पनांना बळकट करू शकते". कायद्याच्या संभाषणासाठी भाषा महत्त्वपूर्ण आहे. शब्द हे वाहन आहे ज्याद्वारे कायद्याच्या मूल्यांचा संवाद होतो. न्यायमूर्ती जी भाषा वापरतात ती केवळ कायद्याच्या व्याख्याच नव्हे तर समाजाबद्दलची त्यांची धारणा देखील दर्शवते.
एका आकडेवारी नुसार अन्याय झालेल्या एकूण स्त्रियांपैकी केवळ २०% स्त्रियाच कोर्टापर्यंत पोहचतात.
आता इथून पुढे कोर्टात त्यांना अशा दूषणांचा सामना करावा लागणार नाही परंतु समाजात वावरतांना अनेक स्त्रियांना किंबहुना प्रत्येक स्त्रीला जीवनात कमीत कमी एकदातरी एकतरी असे शापरुपी दुषण ऐकावेच लागतात त्यामुळे आपल्या समाजाच्या बोलीभाषेत देखील या हँडबुक मधील शब्दांचा वापर होणे अत्यंत आवश्यक आहे.
नाहीतर कोर्टाने किहिती सकारात्मक बदल केले तरी आपल्या समाजाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत स्त्रियांवर हे शब्दरूपी अग्निबाण बरसतच राहतील.
ज्या दिवशी स्त्री अपमानकारक दूषणे आपल्या समाजाच्या मानसिकतेतून जातील त्या दिवशी खऱ्या अर्थाने या वसुंधरेचे, भूमातेचा आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक मातेचा सन्मान होईल.
लवकरात लवकर हे शब्द हद्दपार करण्यासाठी जर आपण शालेय अभ्यासक्रमात नवीन शब्दांचा समावेश केला आणि स्त्री अपमानकारक शब्द वगळण्यात आले तर येणाऱ्या पिढ्यांच्या बोलीभाषेत नक्की बदल दिसून येईल.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, शिक्षणातून आदर्श पिढी घडविण्याचे कार्य गुरुजनांच्या हातून घडते, परंतु माता गुरुहुनहि थोर आहे. "जिच्या हाती पाळण्याची दोरी, तीच जगाते उद्धरी, ऐसी वर्णिली मातेची थोरी, शेकडो गुरुहुनिहि.” लिंगांमधील निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी आणि अनुचित प्रथांचा प्रतिकार करण्याचे प्रयत्न जगभरात होत आहेत, ज्यांना शैक्षणिक आणि अभ्यासक दोघांनीही प्रोत्साहन दिले आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शैक्षणिक, व्यावसायिक आणि कार्यकर्ते सहकार्य करत आहेत. - Krushna
Comments
Post a Comment