सनसनाटी
आपल्याला
वर्तमानपत्रातून किंवा टीव्हीवरती किंवा मोबाईलवरती अनेक खबळजनक, सनसनाटी,
आश्चर्यजनक, अतिरंजित बातम्या पाहायला मिळतात जसे कि, सचिनने गायलं सीमा हैदरसाठी खास गाणं, अशी गर्लफ्रेंड नको रे बाबा!... पहा या गर्लफ्रेंडनी काय केल,
याच
उत्तर पत्रकारिता व जनसंवाद क्षेत्राच्या एका मुल्यामध्ये आहे. त्याच नाव
"सनसनाटी", अतिरंजितपणा किंवा इंग्रजीमध्ये 'सेन्ससन्यालिसम'
असे म्हणतात. याला माध्यमांच्या संदर्भात "सनसनाटीवाद"
असे म्हटल्या जाते. "सनसनाटीवाद" हा शब्द "संवेदना" या
शब्दापासून आला आहे, जो तीव्र भावना किंवा अनुभवांना सूचित
करतो. प्रसारमाध्यमांमधील सनसनाटीपणाचा उद्देश प्रेक्षकांमध्ये तीव्र भावनिक
प्रतिक्रिया निर्माण करणे हा असतो. आजकाल आपल्याला सोसिअल मीडिया प्लॅटफॉर्मवरती
अनेक अशा तीव्र भावनिक बातम्या बघायला मिळतात. अशा बातम्यांचा उद्रेक हा आजकाल
अधिक पाहायला मिळत असला तरी, सनसनाटी" किंवा ‘अतिरंजितपणा’ या शब्दाला मोठा इतिहास आहे आणि तो
कालांतराने विकसित होत गेला आहे, त्याची उत्पत्ती आपल्याला
साधारणतः यूरोपातील आद्योगिकक्रांतीनंतर
सापडते. 19व्या शतकाच्या सुरुवातीला उदयास आलेल्या मुद्रणालये
आणि वृत्तपत्रे यांच्याशी आता पेव फुटलेल्या सनसनाटीचा
संबंध जोडला जाऊ शकतो. वृत्तपत्रे आणि प्रकाशने यांच्यामध्ये स्पर्धा सुरु झाली
आणि त्यांना जाणवले की खळबळजनक आणि धक्कादायक सामग्री असलेल्या कथा वाचकांचे अधिक
लक्ष वेधत आहेत आणि त्याच्या अधिक प्रती विकल्या जात आहेत.
19व्या शतकात, यूरोपात "पेनी ड्रेडफुल्स" हा
स्वस्त आणि खळबळजनक साहित्याचा एक प्रकार होता ज्यात सनसनाटी कथा असायच्या आणि
त्यात तरुण वाचकांना लक्ष केलं जायचं. अशी प्रकाशने,
गुन्हेगारी, भयपट आणि साहसी कथांनी भरलेली होती आणि त्यांनी
खळबळजनक कथाकथन लोकप्रिय करण्यात भूमिका बजावली. याच शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीस युनायटेड स्टेट्समध्ये "यलो जर्नलिझम"
या आधुनिक जर्नलिझमच्या शाखेचा उदय झाला. यात सनसनाटी, अतिशयोक्ती
आणि भावनिक आवाहनावर जोर देणार्या बातम्यांचा समावेश होतो. अमेरिकेतील विल्यम
रँडॉल्फ हर्स्टचे 'न्यूयॉर्क जर्नल' आणि
जोसेफ पुलित्झरचे 'न्यूयॉर्क वर्ल्ड' यासारखी
प्रख्यात वृत्तपत्रे खळबळजनक मथळे आणि त्यांच्या सनसनाटी पद्धतींसाठी ओळखली जात
होती.
20 व्या शतकात रेडिओ आणि टेलिव्हिजनच्या आगमनाने, ही अति भावनिक तथा अति रंजित बातमी पद्धत या नवीन माध्यमांपर्यंत देखील पोहचली, फुलली आणि विस्तारली. क्राईम ड्रामा, टॉक शो आणि रिअॅलिटी टीव्हीयासह नाटकीय आणि खळबळजनक सामग्री असणारे रेडिओ कार्यक्रम आणि दूरदर्शन कार्यक्रम प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागले किंबहुना आजही करतात. सध्याच्या आधुनिक डिजिटल युगात, सनसनाटी झपाट्याने विकसित होत आहे. ऑनलाइन न्यूज आउटलेट्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने सनसनाटी, खबळजनक सामग्री सहजरित्या पसरवणे सोपे केले आहे.आता एका क्षणात अशा बातम्या लाखो लोकांपर्यंत पोहचवता येतात. त्यातून सामाजिक कल्याण बातमी मूल्यापेक्षा अर्थार्जनाचा हेतू जास्त दिसतो. माध्यमातील सनसनाटी बातमी पद्धत जशी बहरत गेली तसे तसे त्याचे प्रकार वाढत गेले. जसे कि, भावनेवर भर असलेल्या बातम्या, यात श्रोत्यांमध्ये तीव्र भावनिक प्रतिक्रिया निर्माण करण्यावर भर दिलेला असतो. यात भीती, राग, धक्का किंवा उत्साह यांचा समावेश असू शकतो. या भावना जागृत करून, मीडिया आउटलेट्स दर्शकांना किंवा वाचकांना गुंतवून ठेवतात. उदा. २०१२ साली संपूर्ण पृथ्वी बुडणार हि बातमी आपण प्रत्येकाने वाचलेली असेलच.
त्यांनतर
अतिशयोक्ती आणि हायपरबोल प्रकारातली बातमी, यात एखाद्या
घटनेचे महत्त्व किंवा प्रभाव अतिशयोक्ती करून मांडलेला असतो, ज्यामुळे ती वास्तविकतेपेक्षा जास्त नाट्यमय दिसते. तुलनेने किरकोळ क्रीडा
इव्हेंटचे वर्णन करण्यासाठी "इंडिया आणि पाकिस्तानमध्ये आज होणार महामुकाबला"
हि बातमी या प्रकाराचे उत्तम उदाहरण आहे. काही वेळा ग्राफिक्सच्या माध्यमातून अशा
सनसनाटी बातम्या आपण अनुभवत असतो यात व्हिज्युअल्सचा वापर प्रेक्षकांना धक्का
देण्यासाठी आणि व्यस्त ठेवण्यासाठी अधिक केला जातो. त्यानंतर संघर्ष आणि वाद-विवाद
या प्रकारातील सनसनाटी जसे कि, हुंकार, हल्ला बोल, दंगल, ताल ठोक के,
सबसे बडा सवाल इत्यादी प्रकारच्या बातम्या तर आपण रोज टेलिव्हिजन
वरती पाहतो यात प्रेक्षकांचे लक्ष वेधण्यासाठी वाद- विवादाला नाटकीय स्वरूपात
आपल्या समोर सादर केले जाते. या बातमी प्रकारात
लोक आपल्याला अति टोकाचे वाद-विवाद करतांना दिसतात.
यातील शेवटचा प्रकार म्हणजे सेलिब्रिटी कव्हरेज यात सार्वजनिक व्यक्तींचे (जसे कि
प्रसिद्ध अभिनेता, अभिनेत्री, प्रसिद्ध
खेळाडू, राजकीय नेते, इ.) वैयक्तिक जीवन आणि घोटाळे मीठ मसाला लावून छापले जातात किंवा दाखवले
जातात. बऱ्याच वेळा अशा बातम्यांमध्ये कथेला साधे आणि भावनिक ठेवण्यासाठी
महत्त्वपूर्ण संदर्भ किंवा घटनेची पार्श्वभूमी वगळली जाते.
चॅनेलची
रेटिंग वाढवण्यासाठी, प्रसार वाढवण्यासाठी
किंवा सोसिअल मीडिया वरती जलद पसरवण्यासाठी आणि त्यातून अधिक पैसे मिळवण्यासाठी
मीडिया आउटलेट्स बर्याचदा हि पद्धती स्वीकारतात. पण अशा बातम्यांचे वाढते प्रमाण
नैतिक चिंता वाढवू शकते कारण स्वतःच्या व्यावसायिक फायद्यासाठी याचा वापर होऊ
शकतो. पत्रकारितेतील सनसनाटीपणामुळे वृत्तांकनाच्या अखंडतेला आणि लोकशाहीच्या
आरोग्याला महत्त्वपूर्ण धोका निर्माण होऊ शकतो. जेव्हा वर्तमानपत्रे किंवा मीडिया
चॅनेल्स अचूकता आणि संदर्भापेक्षा सनसनाटी कथांना प्राधान्य देतात, तेंव्हा त्यातून चुकीची माहिती जाण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे लोकांची दिशाभूल होऊ शकते आणि माहितीपूर्ण निर्णय घेण्यास अडथळा
येऊ शकतो. शिवाय, सनसनाटीपणामुळे मीडियावरील लोकांचा विश्वास
कमी होऊ लागतो, कारण प्रेक्षकांना अशा बातम्यांमागील नफा
आधारित हेतू समजायला लागतात. यातून समाज हा ध्रुवीकृत होतो आणि महत्त्वाच्या
सामाजिक समस्यांवर जनतेचे दुर्लक्ष होते, कारण खळबळजनक,
चटपटीत बातम्या इतर बातम्यांच्या तुलनेत अधिक बघितल्या गेल्यामुळे
इतर महत्वाच्या बातम्या नजरेआड जातात. याव्यतिरिक्त, सनसनाटी
माहितीत भावनिक ट्रिगर म्हणून भीतीचा सतत वापर केल्याने लोकांमध्ये चिंता आणि
असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊ शकते, सामाजिक एकसंधता आणखी
नष्ट होऊ शकते आणि यातून लोकशाही प्रक्रियेला धोका निर्माण होतो.
सनसनाटी
हा प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा एक प्रभावी मार्ग असू शकतो,
परंतु ते दर्शक किंवा वाचकांना आकर्षित करणे आणि अचूक, जबाबदार आणि अर्थपूर्ण पत्रकारिता प्रदान करण्याच्या समतोलाबद्दल नैतिक प्रश्न
देखील उपस्थित करते. - Krushna Dabholkar
Comments
Post a Comment