इकिगाई: जीवनाचे मूल्य, जीवनाचा आनंद

 

हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस लिखित "इकिगाई: दीर्घ आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य"  हे पुस्तक प्रथमतः 29 ऑगस्ट 2017 रोजी इंग्रजीमध्ये प्रकाशित झाले. हे एक विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी पुस्तक आहे जे "इकिगाई" या  जपानी संकल्पनेचा अभ्यास करते आणि ते आपल्याला आपल्या  जीवनात अर्थ आणि आनंद निर्माण करण्यास मदत करते.

लेखकाने कुशलतेने स्वतःच्या आयुष्यातील आठवणी, किस्से आणि मुलाखती एकत्र केल्या आहेत जेणेकरून "इकिगाई" चा सर्वसमावेशक अर्थ उलगडता येईल.



"इकिगायी" हा एक जपानी शब्द आहे आणि तो तत्वज्ञान या अर्थाने वापरल्या जातो. "इकि" (iki)  ज्याचा अर्थ "जीवन" किंवा "जगणे" आणि "गाई" (gai), याचा अर्थ "मूल्य" असा होतो. "इकिगाई" या शब्दाचे सोप्या भाषेत भाषांतर करायचे झाल्यास  "जीवनाचे मूल्य" किंवा "जगण्याचे कारण" असे केले जाऊ शकते.

जापनीज संस्कृतीमध्ये "इकिगाई" हा केवळ एकच शब्द नसून एक संकल्पना आहे ज्यामध्ये जीवनाच्या विविध पैलूंचा समावेश होतो, जसे कि उद्देश, पूर्तता, उत्कटता आणि आनंदाचा शोध इत्यादी पैलू.



"इकिगाई" या शब्दाचा उगम जपानच्या “ओकिनावा” बेटावर झालेला आहे असे जपानी भाषा तज्ज्ञ आणि लेखकांना वाटते. कारण इकिगाई हि संकल्पना तेथील रहिवाशी लोकांचे आरोग्य आणि कल्याणाशी संबंधित वापरली जाते. परंतु आता ती संकल्पना संपूर्ण जपानमध्ये पसरल्याचे जपानी लेखक सांगतात.

 इकिगाई पुस्तकाची संकल्पना चार आवश्यक घटकांच्या भोवती फिरते: आपल्याला काय आवडते, आपल्यामध्ये  चांगले काय आहे, जगाला कशाची गरज आहे आणि आपण काय केल्याने अर्थार्जन करू शकतो. या घटकांचे संरेखन करून आपण आपले जीवन समाधानी जगू शकतो असे लेखकाला वाटते.

आधुनिक ज्ञानासह प्राचीन संस्कृती आणि ज्ञान याचे मिश्रण या पुस्तकात आपल्याला सापडते. लेखक पारंपारिक जपानी संस्कृती आणि ओकिनावामधील शंबरहून अधिक वर्ष लोक कसे जीवन जगतात या बद्दल आणि त्यांचे अनुभव विशद करतो, यात लेखकाने अशा वृद्ध लोकांचे अनुभव व ज्ञान मांडले आहे ज्यासाठी  ते  दीर्घायुष्यासाठी झाले असे ओळखले जातात. लेखकाचे अनुभव तथा पुस्तकाचा सार हा  छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे, नातेसंबंध जोपासणे आणि आपल्या जनसमुदायाची काळजी करणे त्याची इच्छा राखणे  याचे महत्त्व अधोरेखित करतो.

 


या पुस्तकात अशा व्यक्तींच्या प्रेरणादायी कथा समाविष्ट केल्या आहेत ज्यांना त्यांचे इकीगाई (जीवनाचे मूल्य, जीवनाचा आनंद, आवडते काम)  विविध मार्गांनी सापडले आहे. आपले काम छोटे असो किंवा मोठे ते आपले काम पूर्ण प्राणपणाने करतात व त्यातून आनंद निर्माण करतात. ते लोक दीर्घ सामाजिक संबंध निर्माण करतात, इतरांशी सहजतेने वागतात आणि संतुलित जीवनशैली अंगिकारतात. लेखकाला असे वाटते कि, इकिगाईच्या तत्त्वांचा आपल्या जीवनात आपण समावेश करून आनंद निर्माण करू शकतो व  आपणही दीर्घायुषी होऊ शकतो. अर्थपूर्ण आणि आनंदी जीवन जगण्यासाठी लोकांनी त्यांचा आनंद म्हणजे इकिगाई कशी शोधावी आणि स्वीकारावी याबद्दल पुस्तक सखोल मार्गदर्शन करते.

उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला गिटार वाजवायला आवडते, तो गिटार शिकवण्यात निपुण आहे, तो व्यक्ती गिटार वाजवून अर्थार्जन प्राप्त करेल आणि आनंदाने आयुष्य जगेल. या परिस्थितीत लेखकाला वाटते तो दीर्घायुषी होईल कारण त्याची इकिगाई त्याच्या सोबत आहे.

हे पुस्तक  दैनंदिन जीवनातील उद्देश आणि पूर्तता शोधणे तथा आपल्या जीवनात अर्थ आणि आनंद शोधण्यासाठी आपल्याला एक अंतर्प्रेरणा देते.



या पुस्तकाचे मूळ लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस असून हे पुस्तक आत पर्यंत जगातील अनेक भाषेत भाषांतरित झाले आहे. जसे कि, स्पॅनिश,पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन, इटालियन, डच, कोरियन, हिंदी, मराठी इत्यादी.

या पुस्तकाचा मराठी अनुवाद  माय मिरर पब्लिशिंग हाऊस तर्फे प्रसाद ढापरे यांनी केला आहे. 

लेखकाने पुस्तकातुन शतायुषी लोकांच्या मुलाखती आपल्या समोर मांडल्या आहेत आणि त्यांच्या दीर्घायुष्याचं खरं रहस्य आपल्या समोर "ओपन" केलं आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला खात्री पटते कि, प्रत्येक माणसाचा इकिगाई असतोच आणि  हे पुस्तक आपल्यालाही आपला “इकिगाई” सापडायला नक्कीच मदत करते. असे मला वाटते.

Comments