भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे नक्की काय ?

 

 


मानवाची सुरुवात जंगलातील भटकंती पासून सुरु झाली. कित्येक वर्ष भटकंती केल्यावर त्याचे रूपांतर मोठ्या - मोठ्या टोळ्यांमध्ये झाले. त्या टोळ्यांची भटकंती कमी झाल्यांनतर टोळ्यांचे रूपांतर स्थायी गावात झाले. मानव मोठ्या टोळीच्या रूपाने गावामध्ये राहू लागला व आजुबाजुंच्या नैसर्गिक संसाधनावरती आपली उपजीविका भागवू लागला. कालांतराने त्याला वस्तू देवांना घेवाणाची आवश्यकता भासू लागली. त्या पासून गावात बाजार व्यवस्थेची निर्मिती झाली. त्याच काळात गावातील देवाण -घेवाण, लोकांचे संबंध सुरळीत राहावेत यासाठी सरकार (राजा, सत्ताधीश, न्याय निवाडा करणारा) नावाच्या व्यवस्थेची निर्मिती झाली असावी असे मला वाटते.



लोकांमधील देवाण -घेवाण जशी जशी वाढत गेली तशी तशी बाजार व्यवस्था मोठी होत गेली व नियमबद्ध होत गेली. नंतर गावातील बाजार आणि इतर गाव गावा मध्ये मिळून होत गेला. त्यातूनच चलनी नाण्यांची निर्मिती झाली असावी असे मला वाटते.  ज्यावेळी चलनी नाण्यांचा वापर बाजारात वाढू लागला त्यावेळी समाज जीवनावर व बाजार व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला व मनुष्याचे जीवन तथा व्यवहार सोपस्कर होण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या जीवनप्रणाली, समाजपद्धती व त्याधारित बाजारपद्धती उदयास आल्या आणि या वेगवेगळ्या बाजारपद्धतीतून वेगवेगळ्या अर्थव्यवस्था निर्माण झाल्या. या लेखात आपण अर्थव्यवस्था त्यांचे विविध प्रकारा विषयी माहिती घेऊ. आता पर्यंत जगात भांडवलशाही, समाजवादी अर्थव्यवस्था, मिश्र अर्थव्यवस्था आणि आदेशात्मक अर्थव्यवस्था या चार प्रकारच्या अर्थव्यवस्था वेगवेगळ्या वेळी निर्माण झाल्या.



आजच्या एकमेकांशी जोडलेल्या जगात या अर्थव्यवस्था विविध आर्थिक प्रणाली, समाज कार्यपद्धती, संसाधनाचे वाटप आणि संपत्ती निर्माण करण्याच्या पद्धतीला आकार देतात. संपत्ती वितरण, बाजारातील गतिशीलता आणि आपल्या जागतिक परिदृश्याला आकार देणारे वैयक्तिक स्वातंत्र्य यांच्या विविध दृष्टीकोनाचे आकलन करण्यासाठी या आर्थिक प्रणाली समजून घेणे महत्वाचे आहे.



भांडवलशाही अर्थव्यवस्था हि संसाधने आणि उत्पादन स्रोतांच्या खाजगी मालकीवर आधारित व्यवस्था आहे. भांडवलशाही व्यवस्थेत व्यक्ती व व्यवसायांना त्यांचे स्वतःचे आर्थिक हित जोपासण्याचे आणि बाजारातील व्यवहारांमध्ये गुंतण्याचे स्वातंत्र्य असते. भांडवलशाही मुख्यतः स्पर्धा आणि नफ्याच्या हेतूवर अधीक भर देते  काही भांडवलशाही समर्थकांना असेही वाटते कि, भांडवलशाही हि नवकल्पना, वैयक्तिक पुढाकार आणि आर्थिक कार्यक्षमतेला प्रोत्साहन देते. परंतु काही समीक्षक म्हणतात, योग्य रित्या नियमन न केल्यास उत्पन्न असमानता, शोषण आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊ शकतो. सरंजामशाहीला प्रतिसाद म्हणून जन्माला आलेली भांडवलशाही वैयक्तिक स्वातंत्र्य, खाजगी मालमत्ता आणि स्पर्धात्मक बाजारपेठांना महत्व देते.

मध्ययुगाच्या उत्तरार्धात उद्भवलेल्या, यूरोपमध्ये प्रचलित असलेल्या सरंजामशाही (राजपत्रित असे लोक ज्यांच्याकडे जमिनीची तसेच संसाधनाची एक हाती मालकी होती) व्यवस्थेला विरोध म्हणून भांडवलशाही आकार घेऊ लागली.

१८ व्या आणि १९ व्या शतकात विशेषतः पश्चिम यूरोप (म्हणजे मुख्यतः जर्मनी, फ्रांस, इंग्लंड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, ऑस्ट्रिया इत्यादी ) आणि युनायटेड स्टेटसमध्ये भांडवलशाहीच्या विकासाला लक्षणीय गती मिळाली.

ऍडम स्मिथ हे एक प्रख्यात स्कॉटिश अर्थ शास्त्रज्ञ भांडवलशाही सिंद्धांताच्या विकासातील प्रमुख व्यक्तींपैकी एक मानले जातात. १७७६ मध्ये त्यांनी "द वेल्थ ऑफ नेशन्स" या नावाने एक संशोधन लेख प्रकाशित केला होता. या लेखाने भांडवलशाहीची तत्वे समजून घेण्याचा पाया घातला. स्मिथ यांनी बाजार, वैयक्तिक फायदा आणि आर्थिक बाबीमध्ये मर्यादित सरकारी हस्तक्षेप यांच्या महत्वावर भर दिला. त्यांनतर १८ व्या शतकातील ग्रेट ब्रिटनमध्ये सुरु झालेल्या औद्योगिक क्रांतीने भांडवलशाहीला आकार देण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात केली. याच काळात उद्योजकांनी आणि भांडवलदारांनी तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या संधींचा फायदा घेतला.

भांडवलशाही नवतत्वांनी मध्यमवर्गाच्या वाढीस हातभार लावला व त्यातून त्यांनी आर्थिक वाढीसाठी, नवकल्पना, उद्योजगता, ज्ञान - विज्ञान प्रगतीच्या विशीषीकरणाला  प्रोत्साहन दिले. तथापि भांडवलशाहीचा जसा जसा विस्तार होत गेला तशी तशी उत्पन्नातील असमानता, कामगारांचे शोषण, आणि पर्यावरणीय ऱ्हासाला सुरुवात झाल्याचे दिसून येते.



भांडवलशाहीचे नेमके मूळ शोधणे कठीण असले तरी त्याचा विकास सरंजामशाहीचा ऱ्हास, औद्योगिक क्रांती आणि बाजार आदारीत अर्थव्यवस्थांचा उदय या कारणांनी भांडवलशाहीला आरंभ बिंदू मिळाला असे म्हणता येईल.

आता आपण समाजवादी अर्थव्यवस्था बघूया. समाजवादी अर्थव्यवस्था हि एक अशी आर्थिक व्यवस्था आहे ज्यामध्ये संसाधांवरती आणि उत्पन्नाच्या स्रोतांवरती सामूहिक मालकी असते. सर्व संसाधने व स्रोत समाजाच्या मालकीचे असतात. समाजवादी अथयव्यवस्थेचे सामाजिक कल्याणाला चालना देणे, असमानता कमी करणे, वैयक्तिक नफ्यापेक्षा समाजाच्या भल्याला प्राधान्य देणे हे प्रमुख वैशिष्ठये आहेत. काही समाजवादी अर्थव्यवस्था समर्थकांना असे वाटते कि, हि अर्थव्यवस्था समाजाला संरक्षण प्रदान करते. परंतु काहींना असेही वाटते कि, हि अर्थव्यवस्था नवकल्पना निर्मितीला रोखू शकते आणि संसाधन वापरातील अकार्यक्षमतेस कारणीभूत ठरू शकते. समाजवादी अर्थव्यवस्थेचे मूळ हे १९ व्या शतकात आहे. याची सुरुवात औद्योगिक भांडवलशाहीने आणलेल्या सामाजिक आणि आर्थिक असमानतेला विरोध म्हणून झाली. हेन्नी डी सेंट -सायमन, चार्ल्स फोरियर आणि रॉबर्ट ओवेन यासारख्या तत्वज्ञांच्या कल्पनेतून समाजवादी अर्थव्यवस्थेची पायाभरणी झाली.

कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगेल्स यांनी १९४८ मध्ये " कम्युनिस्ट मॅनिफेस्टो" द्वारे समाजवादी सिद्धांताला आकार देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

विविध देशांनी लोकशाही समाजवादापासून ते अधिक केंद्रित नियोजित अर्थव्यवस्थेपर्यंत समाजवादाचे विविध प्रकार लागू केले आहेत. कामगार चळवळी, सामाजिक अन्याय आणि आर्थिक संकटे यासारख्या घटकामुळे समाजवादी अर्थव्यवस्था आकार घेत आहे.



या क्रमातील तिसरी व्यवस्था म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था. हि व्यवस्था भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही घटकांना एकत्र करते. या व्यवस्थेत खाजगी मालकी आणि अर्थव्यवस्थेतील सरकारी हस्तक्षेप यांचे मिश्रण आहे.

मिश्र अर्थव्यवस्थांमध्ये सरकारे बाजाराचे नियमन करतात. सामाजिक सेवा प्रदान करतात आणि आर्थिक विकासास समर्थन देतात. मिश्र अर्थव्यवस्थांच्या उदयामध्ये युनायटेड स्टेटस या देशाने विशेष भूमिका बजावली. सध्याच्या परिस्थितीत आपला भारत देश, युनायटेड स्टेटस, ऑस्ट्रेलिया, आणि बहुतांश यूरोपीय राष्ट्रमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. तसेच अनेक देश मिश्र अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करत आहेत परंतु त्यांचा कल मिश्र अर्थव्यवस्थेसह भांडवलशाहीकडे अधिक आहे. 

युनाटेड स्टेटसचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फँकलिन डी. रुझवेल्ट यांनी महामंदीच्या वेळी धोरणे नियमन, सार्वजनिक कार्य कार्यक्रम आणि सामाजिक कल्याण प्रणालींच्या स्थापनेद्वारे अर्थव्यवस्थेत सरकारचा हस्तक्षेप वाढवला आणि मिश्र अर्थव्यवस्थेला चालना दिली. मिश्र अंर्थव्यवस्थांच्या विकासात महामंदी (१९२९ ते १९३३) हा एक महत्वाचा क्षण होता. महामंदी दरम्यान व्यापक बेरोजगारी, गरिबी आणि सामाजिक अशांतता यांनी सरकारांना अर्थव्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी आणि सामाजिक कल्याण सुनिश्चित करण्यासाठी अधिक सक्रिय भूमिका घेण्यास प्रवृत्त केले. मिश्र अर्थव्यवस्था तिच्या निर्मितीपासून सतत विकसित होत आहे आणि बदलत्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीशी जुळवून घेत आहेत.

आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये सर्व संसाधनावरती उत्पादन स्रोतांवरती सरकारचे नियंत्रण असते. सरकारी आदेशाशिवाय या व्यवस्थेत कोणताही बदल होत नाही. आदेशात्मक अर्थव्यवस्था सामान्यतः कम्युनिस्ट किंवा हुकूमशाही शासनांशी संबंधित असतात. उदा. उत्तर कोरिया, आणि माझी सोव्हियत युनियन. कम्युनिझम आणि समाजवादी नियोजनाच्या सामाजिक आणि आर्थिक विचारसरणीला प्रतिसाद म्हणून २० व्या शतकाच्या सुरुवातीला आदेशात्मक अर्थव्यवस्थेची उत्पत्ती झाली तथापि ती १९१७ च्या रशियन क्रांतीपासून शोधली जाऊ शकते.

 व्लादिमिर इलिच लेनिन बोल्शेव्हिक पक्षाचे (नंतरच्या सोव्हिएत कम्युनिस्ट पार्टीचे) नेते आणि सोव्हियत युनियन चे पहिले प्रमुख यांनी आदेशात्मक अर्थव्यवस्थेच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये सरकार कोणत्या वस्तूंचे उत्पादन आणि सेवांची निर्मिती करावी हे निर्धारित करते तसेच उत्पादन लक्ष ठरवते, संसाधनाचे वाटप करते आणि किंमती नियंत्रित करते. आदेशात्मक अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ठे आर्थिक समानतेला चालना देणे आणि विशिष्ट सामाजिक उद्दिष्ठे साध्य करणे हे असले तरी समीक्षकांचा असा युक्तिवाद आहे कि, निर्णय घेण्याच्या केंद्रीकृत स्वरूपामुळे ते अकार्यक्षम, नवकल्पना अभाव आणि  मर्यादित वैयक्तिक स्वातंत्र्यास कारणीभूत ठरू शकतात  (किंबहुना ठरत आहेत).  



जगामध्ये विविध आर्थिक प्रणालींचा समावेश आहे ज्यामध्ये संसाधनाचे वाटप कसे केले जाते. संपत्ती निर्माण केली जाते आणि समाज ती संपत्ती वापरून कशा प्रकारची कामे करतो या गोष्टींमुळे त्या प्रणालींना आकार मिळतो. भांडवलशाही हि एक अशी आर्थिक व्यवस्था आहे ज्यामध्ये संसाधने आणि उत्पादन स्रोत खाजगी मालकाकडे असतात तर दुसरीकडे समाजवादामध्ये संसाधने व उत्पन्नाच्या स्रोतांवरती सामूहिक मालकी असते. अनेक देशांनी अनेक वर्ष या दोन्ही पैकी एक अर्थव्यवस्था स्वीकारली आहे पण सध्यघडीला या दोन्हीचा परिपाक म्हणून जगातील बहुतांश देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहेत. ज्यात भांडवलशाही आणि समाजवाद यांचे मिश्रण आहे.

कोणती आर्थिक व्यवस्था निवडावी हे ऐतेहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय संदर्भ तसेच समाजाचा प्राधान्यक्रम, सामाजिक मूल्य अशा विविध घटकावरती अवलंबून असते. तथापि आर्थिक प्रणाली सतत विकसित होत असतात. लोकांच्या संपत्ती, संधी आणि सामाजिक कल्याणाच्या वितरणाभोवती असलेल्या अपेक्षा, आकांक्षा आणि त्यातील वाद विवाद याभोवती बहुतांश आर्थिक प्रणाली फिरतांना दिसतात.    -Krushna Dabholkar

Comments