पुण्यातील खंडुजीबाबा विठ्ठल मंदिर : महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

 पुण्याच्या इतिहासात विठ्ठल मंदिरांनी एक वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. पुण्याच्या वेगवेगळ्या भागात आपल्या विठ्ठल मंदिर दिसून येतात. त्यापैकीच एक म्हणजे लकडी पुलाच्या शेवटच्या टोकाला म्हणजे डेक्कन जिमखाना पुलाची वाडी येथे असलेले श्री खंडुजीबाबा विठ्ठल मंदिर. छत्रपती संभाजी महाराज किंवा लकडी पुलावरून डेक्कन बस स्टॉपकडे आल्यावर सुमारे २०-२५ दगडी पायऱ्या उतरून खाली गेलो, कि मुठा नदीच्या तीरावर निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर साकारलेले आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाला असल्याने मंदिराची ठेवणं आधुनिक पद्धतीची दिसून येते.

मंदिराला प्रशस्त प्रांगण लाभले आहे. मंदिराला पेशव्यांनी अनेकदा भेट दिल्याच्या नोंदी सापडतात. मंदिराच्या गर्भगृहातच वै. हभप खंडुजीबाबा यांची समाधी आहे. या समाधीवरील खंडुजीबाबांचा मुखवटा त्यांच्यातील सांप्रदायिक अस्तित्वाचा खुणा सहज सांगून जातो. गर्भगृहासमोर असलेल्या सभामंडपात अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. गर्भगृहाच्या लगतच विठ्ठल क्मिणीच्या काळ्या पाषाणातील मूर्तीचे दर्शन होते. रुक्मिणी विठ्ठलाची मूर्ती २००-२५० वर्षपुरातन असल्याचे सांगितले जाते. मुठा नदीच्या तीरावर निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर साकारलेले आहे.


मंदिरात माउली -तुकोबांच्या सुंदर प्रतिमा आहेत. याबरोबरच मारुतीची, गुरुदेव दत्त्तांची मूर्ती आणि शंकराची पिंडही येथे आहे. प्रशस्त प्रांगणात जुने डेरेदार पिंपळाचे झाड आहे आणि येथे असलेले चौथरा इथे होत असलेल्या अनेक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ प्रदान करतो.


या मंदिरात तीन सप्ताह होतात, गोकुळाष्टमी, रामनवमी आणि खंडुजीबाबा पुण्यतिथी. पंढरपूरची आषाढ वारी सुरु होण्याआधी दोन दिवस हभप खंडुजीबाबांची पुण्यतिथी असते. या काळात काकडआरती, गाथाभजन, हरिपाठ, कीर्तन, असे सोहळे होतात. १९६१ ला आलेल्या पुरात मंदिराचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण मंदिर वाहून गेले होते. मात्र खंडुजीबाबाची समाधी येथे सुरक्षित होती, असे लोक सांगतात. १९७१- ७२ मध्ये या मंदिराचा पुन्हा नव्याने जोर्णोध्दार करण्यात आला. आषाढ वारी दरम्यान हजारो वारकरी या मंदिराला भेट देतात आणि तिथे नांदत असलेली विठ्ठल माय माऊली हजारो भक्त वारकऱ्यांना मायेचा आधार देऊन पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद देते.


Comments