“इस्कॉन" इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना
भक्तिवेदांत
स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे स्थापित "इस्कॉन" म्हणजेच इंटरनॅशनल सोसायटी
फॉर कृष्णा चेतना हि १९६६ मध्ये न्यूयॉर्क शहरात स्थापना झालेली संस्था सामान्यत: हरे
कृष्ण चळवळ नावाने ओळखली जाते. हि एक जगभर पसरलेली गौडीय वैष्णव हिंदू धार्मिक संस्था
आहे. इस्कॉन ही गौडीय वैष्णव परंपरेची सर्वात मोठी आणि सर्वात महत्त्वाची अध्यात्मिक
शाखा आहे. वैष्णव धर्म म्हणजे "विष्णूची उपासना" आणि गौड म्हणजे पश्चिम बंगाल
आणि बांगलादेशातील गौडा प्रदेशात उगम झालेली संस्था. या चळवळीचे पुढील नामांतर म्हणजे
इस्कॉन. गौडीय वैष्णव हिंदू धार्मिक संस्थेचे भारतात 16 व्या शतकाच्या सुरुवातीपासून
अनुयायी असल्याचे पुरावे आहेत तसेच 1900 च्या दशकाच्या सुरुवातीपासून अमेरिकन आणि युरोपियन
प्रदेशामध्ये अनेक अनुयायी तयार झाल्याच्या नोंदी आहेत. सध्याच्या घडीला इस्कॉन ही
जगभरातील सर्वात प्रमुख आणि प्रभावशाली आध्यात्मिक चळवळींपैकी एक बनली आहे.
1966 मध्ये भक्तिवेदांत स्वामी श्रीला प्रभुपादांनी
भगवान श्रीकृष्णाचे अध्यात्मिक ज्ञान आणि प्राचीन वैदिक ज्ञानाचा प्रसार करण्याच्या
उद्देशाने भारत ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका असा प्रवास केला. ते मानवतेबद्दलच्या
करुणा भावनेने आणि भगवतगीता आणि श्रीमद भागवतातील गहन आध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार तथा
प्रसार करण्याच्या इच्छेने प्रेरित होते. भगवान श्रीकृष्णाची मनापासून भक्ती केल्याने
लोकांना जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून खरा आनंद आणि मुक्ती मिळू शकते यावर त्यांचा ठाम
विश्वास होता. याच प्रेरणेतून त्यांनी भागवतगीतेतील भक्ती योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी
इस्कॉनची स्थापना केली. या चळवळीचे अनुयायी त्यांचे विचार आणि कृती श्रीकृष्णाला प्रसन्न
करण्यासाठी समर्पित करतात, श्रीकृष्णाला ते परम भगवान मानतात. नृत्य आणि गाण्याद्वारे
श्रीकृष्णाची भक्ती सार्वजनिकपणे व्यक्त करण्याची प्रथा या चळवळीचा विशेष भाग आहे.
कीर्तन हा देवाप्रती भक्ती व्यक्त करण्याचा मार्ग तथा नवोदितांना चळवळीकडे आकर्षित करण्याचा एक सुलभ पर्याय
आहे असे ते मानतात. मृदंग, हाताची झांज आणि हार्मोनिअम यांसारख्या वाद्यांसह भक्तीगीत
गाण्यासाठी भक्त सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांवर आणि उद्यानांमध्ये जमतात व श्रीकृष्णाचा
जयघोष करतात. श्रीकृष्णाची आरती हि इस्कॉन संस्थेतील महत्वाची पूजा मानली जाते. आरती
दरम्यान, भक्त श्रीकृष्णाच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला पाणी, धूप, अग्निदिवा आणि फुले
अर्पण करतात तसेच प्रार्थना आणि भजने म्हणतात. इस्कॉनचे भक्त श्रीकृष्णाची पूजा करण्यासाठी,
ज्येष्ठ भक्तांचे प्रवचन ऐकण्यासाठी, प्रार्थनेत भाग घेण्यासाठी आणि प्रसादरूपी अन्न
ग्रहणकरण्यासाठी नियमितपणे (विशेषतः रविवारी) इस्कॉनच्या मंदिरांना भेट देतात.
दीक्षा
समारंभा दरम्यान इस्कॉनचे भक्त चार मूलभूत नियमांचे पालन करण्याची शपथ घेतात. ते चार
नियम म्हणजे मांसाहार कटाक्षाने टाळणे तथा केवळ शाकाहारी आहाराच घेणे, कोणत्याही मादक
पदार्थांचे (कॉफी, चहा, सिगारेट, ड्रग्ज आणि अल्कोहोल) सेवन न करणे, जुगार न खेळणे
आणि विवाहाबाह्य संबंध न ठेवणे. इस्कॉन चळवळीतील भक्त श्रीकृष्ण जन्माष्टमी, राधाष्टमी,
दिवाळी, गौरा पौर्णिमा, एकादशी, होळी, रामनवमी आणि गीता जयंती यासह विविध हिंदू सण
साजरे करतात तसेच साप्ताहिक मेळावेही आयोजित केल्या जातात. या संस्थेचा रथयात्रा उत्सव
हा एक प्रसिद्ध वार्षिक परेड आहे ज्यामध्ये भक्त जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या
मूर्ती रथामध्ये ठेवून तो रथ ओढतात. या सार्वजनिक मिरवणुकीत सामान्यत: भक्ती गीत गायन,
नृत्य आणि मोफत शाकाहारी भोजन दिले जाते.
इस्कॉनची
800 हून अधिक मंदिरे आणि केंद्रे जगभरातील प्रमुख शहरांमध्ये पसरलेली आहेत. या मंदिरांमध्ये
प्रामुख्याने हरे कृष्ण मंत्राचा जाप केला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये, इस्कॉन चळवळीच्या
अनुयायांमध्ये तसेच हितचिंतकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या चळवळीद्वारे चालवले जाणारे
हजारो अध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम देश परदेशातील लोकांना प्रेरणा देतात. प्रभुपादांचे
लेखन आणि भाषांतरे ज्यात श्रीमद भगवतगीता तसेच श्रीमद भागवत (भागवत पुराण), चैतन्य
चरितामृता आणि इतर धर्मग्रंथांचा समावेश आहे. हि सर्व पुस्तके सत्तरहून अधिक भाषांमध्ये
उपलब्ध आहेत आणि ती इस्कॉनचे धर्मग्रंथ म्हणून उदयास आली आहेत.
इस्कॉन
चळवळीचे तत्त्वज्ञान प्राचीन वैदिक ग्रंथांच्या शिकवणीवर आधारित आहे. ज्यात श्रीमद
भगवतगीता आणि भागवत पुराणांवर विशेष भर देण्यात आला आहे. इस्कॉनचे ब्रीदवाक्य "जप
करा आणि आनंदी व्हा" असे आहे. इस्कॉनचे
प्राथमिक उद्दिष्ट प्रेम आणि देव चेतना जागतिक स्तरावर पसरवणे, सर्व प्राणिमात्रांची
काळजी घेणे तथा त्यांचा आदर करणे यामूल्यावर आधारित अध्यात्मिक समाज निर्माण करणे हे
आहे. भक्ती-योगाच्या भक्तिपरंपरेचे जागतिक स्तरावर पुनरुज्जीवन करण्यात इस्कॉनने महत्त्वपूर्ण
भूमिका बजावली आहे. यामुळे हजारो लाखो व्यक्तींना शांतता, सौहार्द आणि आध्यात्मिक जीवनाचा
मार्ग स्वीकारण्यास उत्तेजना मिळाली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठात ई. बर्क रॉचफोर्ड
ज्युनियर यांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, इस्कॉनमधील
सदस्याद्वारे लोकांना किंवा स्वतः लोकांद्वारे इस्कॉनशी जुडण्यासाठी चार प्रकारे संपर्क
केला जातो ज्यामध्ये स्वप्रेरणेने झालेला संपर्क, सार्वजनिक क्षेत्रातील सदस्यांशी
केलेला संपर्क, वैयक्तिक संबंधाद्वारे केलेला संपर्क आणि चळवळीबद्दल सहानुभूती असलेल्या
लोकांशी साधलेला संपर्क इत्यादी समाविष्ट आहेत.
इस्कॉन
हि एक कृष्ण चेतनेची आंतरराष्ट्रीय संस्था आहे, सध्याच्या परिस्थितीला हि संस्था जगभरातील
आध्यात्मिक साधकांसाठी एक मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. त्यांचे प्रगल्भ तत्वज्ञान,
अखंड सेवा, समृद्ध सांस्कृतिक वारसा, प्रेम आणि एकात्मता जोपासण्यासाठीचे समर्पण लाखो
लोकांपर्यंत पोहचले आहे.
- कृष्णा दाभोलकर
Comments
Post a Comment