तो अतिसार आहे कि आमांश आहे

 


आला पावसाळा तब्येत सांभाळा अशा सूचना आपण दर पावसाळ्यात वर्तमानपत्रातून, वृत्तवाहिन्यांवरून आणि आजकाल सोशिअल मीडिया वरून नक्की ऐकतो.

पावसाळ्यात वेगवेगळ्या साथीचे संसर्गात्मक रोग, आजार प्रदूषित वातावरातून, पाण्यातून पसरतात त्यापैकी एक मुख्य आजार म्हणजे जुलाब लागणे किंवा हगवण लागणे. आपण गावाखेड्यात किंवा अगदी शहरात सुद्धा लोकांच्या तोंडून ऐकतो कि मला जुलाब झाला आहे किंवा मला लूज मोशन होत आहे. पण हे हगवण लागणे किंवा जुलाब लागणे किंवा लूज मोशन होणे नेमके आहे तरी काय हे जाणून घेऊया.



हगवण लागणे किंवा जुलाब लागणे याचे मुख्यतः दोन प्रकारात वर्गीकरण करता येते. पहिला प्रकार म्हणजेअतिसार” (Diarrhea) आणि दुसरा प्रकार म्हणजेआमांश” (Dysentery). अतिसार म्हणजे हि एक अशी स्थिती आहे यात व्यक्तीला मलवृत्ती होते. मल पातळ होण्याचे प्रमाण वाढते आणि दिवसातून अनेकवेळा सौचास जावे लागते. अतिसार हा मुख्यतः दूषित पाण्यामुळे, अस्वच्छ आहार घेतल्यामुळे होतो.  पण तो कधी कधी रुग्णाने घेतलेल्या औषध किंवा गोळ्यांच्या सेवनाने देखील होऊ शकतो. अगदी खोलातच जाऊन सांगायचे झाले तर अतिसार हा जिवाणू, विषाणू किंवा इतर परजीवी संक्रमणामुळे होतो. अतिसार झाल्यानंतर पोटात दुखणे, पोटात गोळा येणे, मळमळ होणे, दिवसातून तीन किंवा चार वेळा सौचास जावे लागणे अशी लक्षणे दिसून येतात.

याउलट आमांश (Dysentery) हा अतिसाराचा अधिक गंभीर प्रकार आहे. ज्यामध्ये आतड्यांच्या आतील भागात जळजळ होते. आमांश सुद्धा जिवाणू विषाणू सारख्या रोगजनुकामुळेच होतो. आमांशाचे वेगळे वैशिष्ठे म्हणजे पोटात वेदना होतात, विष्ठेवाटे म्युकस किंवा रक्त पडते अधिक वेळा त्वरित सौचास जावे लागते सौच करतांना वेदना होतात. आमांश (Dysentery) कधी कधी गैरसमजातून अतिसार (Diarrhea) किंवा जुलाब समजल्या जातो.

 


एका सर्वेनुसार अतिसारामुळे दरवर्षी पन्नास लक्ष व्यक्ती मरण पावतात. गरीब राष्ट्रातील मृतांमध्ये मुख्यतः लहान मुले अधिक असतात. दीर्घ कालीन अतिसारामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात तसेच आतड्यांचे रोग, अन्ननलिका दाह आणि इतर लवकर बरे होणारे रोग होऊ शकतात.  अतिसारामुळे मोठ्या आतड्यातून जेव्हडे पाणी शोषून घेतले जाते त्याहून अधिक बाहेर पडते. दररोज जेव्हढ्या पाण्याची आवश्यकता शोषून आहे त्याहून अधिक पाणी मोठ्या आताड्यात शोषले जाते. ज्या वेळी मोठ्या आतड्यातील पाणी शोषून घेण्याची क्षमता कोलमडून पडते तेंव्हा अतिसार होतो. दीर्घकालीन अतिसारामध्ये रक्ताच्या नमुन्याच्या टेस्ट करणे बंधनकारक ठरते कारण त्या परिस्थितीत वेगवेगळे रोग जसे कि, एड्स, मधुमेह, अल्सर तसेच दुग्धशर्करा सहन होण्याचा विकार असू शकतात. अतिसारामुळे शरीर शुष्कता येऊ शकते. त्यामुळे अधिक तहान लागणे, तोंड कोरडे पडणे, अशक्तपणा येणे, डोके हलके झाल्यासारखे वाटणे, उभे राहिल्यानंतर चक्कर येणे, मूत्रविसर्जन कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात.

अतिसाराच्या बहुतेक रुग्णामध्ये जोपर्यंत अतिसार तीव्र होत नाही तोपर्यंत निदान करण्याची आणि उपचार घेण्याची फारशी आवश्यकता नसते. आपण घरी राहून उपचार करू शकतो यामध्ये ओआरएस (ओरल रिहायड्रेशन सोल्युशन), नारळाचे पाणी, इलेकट्रोड  पावडर, ग्लुकोज आणि भरपूर प्रमाणात तापवलेले सौम्य पाणी पिणे योग्य ठरते. तोंडाने किंवा शिरेमधून सलाइन द्वारे शरीरातील पाण्याचे, क्षारांचे प्रमाण पूर्ववत करता येते, परंतु दीघकाल अधिक शुष्कता जाणवत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणे आवश्यक आहे.

या आजराच्या सुरुवातीच्या काळामध्ये आपण जागतिक आरोग्य संघटनेने सुचविलेले मिश्रण बनवून थोडे थोडे सतत घेत राहिल्यास प्रथम उपचारातच हा आजार बरा होऊ शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेने पुढील फॉर्मुला सांगितलेला आहे. घरगुती मीठ तीन चतुर्थांश चमचा अधिक खाण्याचा सोडा एक चमचा अधिक एका संत्र्याचा रस एक लिटर पाण्यामध्ये घेणे चालू ठेवावे. किती आणि कोणते अन्न घ्यावे यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सुरुवातीच्या काळात हा साधारण जुलाब नसून आमांश आहे हे जाणवल्यास मात्र योग्य उपचार घेणे महत्वाचे आहे.



आपल्या देशात आमांश वरील प्रभावी उपचारासाठी पुढील चार पद्धती सामान्यतः वापरल्या जातात ज्या जवळ जवळ अतिसाराच्या उपचारपद्धती प्रमाणेच काम करतात. ) हायड्रेशन - शरीरातील पाणी कमी होण्यास प्रतिबंध करण्यासाठी ओरल रिहायड्रेशन सोल्युशन (ओआरएस) आणि इलेकट्रोलाइट्स पिण्याचा सल्ला दिला जातो. ) अँटिबायोटिक्स- आमांश जिवाणू संसर्गामुळे झालेला असल्यास सिप्रोफ्लोक्सासिन किंवा अजिथ्रोमाइसिन सारखी प्रतिजैविके दिली जातात ) अँटीपॅरासाइटिक औषध- अमीबिक डिसेंट्रीवर मेट्रोनिडाझोल किंवा टिनिडाझोल सारख्या विशिष्ट अँटीपॅरासाइटिक औषधांनी उपचार केले जातात, जे संक्रमणास कारणीभूत असलेल्या अमिबाला नष्ट करण्यात प्रभावी आहेत ) लक्षणात्मक आराम - पोटात वेदना आणि पेटके कमी करण्यासाठी वेदनाशामक औषधी दिली जातात.

अतिसार (डायरिया) मध्ये प्रामुख्याने पचनसंस्थेतील संसर्ग, चुकीचे खाणेपिणे, औषधांचे सेवन यामुळे होतो आणि अतिसार, पोटात दुखणे अशी लक्षणे दिसतात तर या उलट आमांश हा एक प्रकारचा पोटाचा संसर्ग आहे जो सामान्यतः जीवाणू, परजीवी किंवा सूक्ष्मजंतूंमुळे होतो. यात विष्ठेद्वारे रक्त जाणे समाविष्ट आहे, ज्यामुळे विष्ठा पाणचट आणि दुर्गंधीयुक्त आणि अगदी वेदनादायक बनते.  त्यावरती वैद्यकीय उपचार केलेच पाहिजेत.

आमांश किंवा अतिसार हि भारतातील सार्वजनिक आरोग्य खात्यासमोरील महत्वाची समस्या आहे. आमांश किंवा अतिसार रोखण्यासाठी पिण्याचे स्वछ पाणी, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छ गरम आहार, योग्य अन्न हाताळणी, साबणाने हात स्वच्छ धुणे या सारख्या उपायांची महत्वपूर्ण भूमिका आहे.

Comments