ज्यांची बाग फुलून आली
विषमता ही एक अशी गोस्ट आहे ज्याचा संबंध सरळ सरळ आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाशी असतो. तो आपल्याला सकाळी उठल्यापासून ते कामावरून परत येऊन झोपे पर्यंत जाणवतो. तो आपल्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यायाने व्यवहारिक जीवनावर परिणाम करतो. नवउदारवादी धोरणांचा स्वीकार केल्यानंतरच्या काळात विषमता वाढीस अनेक पातळीवरून प्रोत्साहनच मिळतांना दिसत आहे. पूर्वी विषमता गरिबी आणि श्रीमंती याच भोवती ठळक दिसायची पण आता विषमतेची व्याप्ती वाढत जाऊन ती आपल्या जीवनावरती तीक्ष्ण परिणाम करतांना दिसतेय.
म्हणजे बघा असं कि, आपल्याला सरकारी नोकरदार आणि खाजगी नोकरदार यांच्यातील आजच्या घडीचा टोकाचा फरक हे एक बदलत चाललेल्या विषमतेच लक्षण आहे. यात अजून सूक्ष्मआर्थिक भेदभाव बघायचा झाला तर नियमित म्हणजे पर्मनन्ट सरकारी नोकरदार आणि कंत्राटी नोकरदार याची प्रति बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन बदललेला दिसतोय. मेट्रोसिटी जसे कि पुणे, मुंबई येथे ज्याचा स्वतःचा फ्लॅट घर आहे आणि जो भाडेतत्वावर राहतो या दोघांकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदललेला आहे . आजकाल तर लोक एकमेकांचे कपडे, हातात घातलेली घड्याळ, घराची अवस्था, वापरत असलेली चारचाकी, दुचाकी, मुले इंग्लिश शाळेत शिकतात कि मराठी शाळेत शिकतात, भाषा इंग्लिश आहे कि मराठी हे बघून नाते जोडताना दिसतात किंवा भविष्यातील व्यवहार ठरवतांना दिसत आहेत.आणि हा भेदभाव इतका टोकाचा झालाय कि, तो अगदी मुलांना शाळेत टाकण्यापासून ते त्यांचं लग्न ठरवण्यापर्यंत दिसतोय . पूर्व सर्व सामान्य परिस्थिती आणि जोडा जुळत असेल तर मुलामुलींची लग्न लावून दिली जायची परंतु सध्या घडीला आर्थिक विषमतेचा परिपाक म्हणून कि काय, सर्वसामान्य मुला - मुलींच्या आर्थिक अपेक्षा खूप बदललेल्या आहेत. आपल्याला आजकाल आपल्या आजूबाजूला लोक फक्त पैशांना केंद्र स्थानी ठेऊन चर्चा करतांना दिसत आहेत. आपल्याला एका बाजूला भव्यदिव्य इमारती उभ्या दिसतात तर दुसरीकडे लोक दोन वेळच जेवण मिळवण्यासाठी भटकतांना दिसतात. ऑक्सफाम इंटरनॅशनलचे कार्यकारी संचालक "विन्नी ब्यान्येमा" यांच्या मतानुसार भारतातील गरिबांना पुरेसे अन्न मिळत नाहीये किंवा मुलांना औषधे देण्यासाठी पैसे नाहीत परंतु काही भारतीय अब्जाधीशांची संपत्ती, प्रतिदिन काही हजार कोटी रुपयांनी वाढत आहे. भारतातील केवळ एक टक्के लोकांकडे देशातील ५८ टक्के इतकी संपत्ती एकवटली आहे. समाजाची प्रगती आणि आरोग्य टिकवायचे असेल तर वाढत्या आर्थिक विषमतेला लवकरात लवकर आळा घालण्यात आला पाहिजे आणि तो एकमेकांना साहाय्य करून, एकमेकांच्या अडचणीत मदत करूनच काही अंशी तरी साध्य होईलच. सरकार त्यांच्या परीने विषमता कमी करण्याचा प्रयत्न करत असले तरी समाज म्हणून आपल्या पेक्षा दिन दुबळ्यांना, कमकुवत गरजू लोकांना आर्थिक दृष्ट्या भक्कम लोकांनी मदत करून सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे. दत्ता हलसगीकर यांनी याविषयी कवितेतून फार सुंदर विचार मांडलेले आहेत. ते खालील प्रमाणे,
ज्यांची बाग फुलून आली,
त्यांनी दोन फुले द्यावीत..
आभाळाएवढी ज्यांची उंची
त्यांनी थोडेसे खाली यावे..
मातीत ज्यांचे जन्म मळले,
त्यांना उचलून वरती घ्यावे.
लेखक - कृष्णा दाभोलकर
(लेखक कृषी जैवतंत्रज्ञानाचे पदवीधर आहेत तसेच पत्रकारिता आणि जनसंवाद शाखेतून पदव्यूत्तर शिक्षण घेतलेले आहे )
Comments
Post a Comment