वेदना, नैराश्य आणि अस्थिरता: पुनर्निर्मिसाठी सुपीक भूमी
वेदना, नैराश्य आणि अस्थिरता: पुनर्निर्मिसाठी सुपीक भूमी
मानव समाजाचा एक आश्चर्यकारक पण शाश्वत नियम आहे, जेंव्हा त्यांच्या खोलवर रुजलेल्या मान्यतांवर कोणी प्रश्न उपस्थित करतो, तेंव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया नेहमीच नकार, टीका किंवा धिक्काराची असते. हे तेव्हाही घडते, जेव्हा ती टीका त्यांच्या स्वतःच्या हितासाठीच केलेली असते. कारण सामान्य मानवाचे ज्ञान मर्यादित असते. तो स्वतःच्या अनुभवांच्या चौकटीपलीकडे पाहू शकत नाही. नवीन विचार असो, नव्या कृती असोत किंवा जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन.
विश्वात नवे निर्माण नेहमी जुन्या अवशेषांवरच उगम पावते. निर्माणाचा जन्म विध्वंसातून, प्रकाशाचा जन्म अंधारातून, तर परिवर्तनाचा जन्म वेदना आणि निराशेतून होतो. हीच वाढीची विस्मयकारक प्रक्रिया आहे.अंधार पार केल्याशिवाय प्रकाशाचा अनुभव येत नाही.
जो मनुष्य या अंतर्मुख प्रवासावर जाण्याचे साहस करतो, जुने भ्रम, जुनी ओळख, जुने विश्वास मोडून टाकण्याची तयारी ठेवतो तो अदम्य बनू शकतो. अशा व्यक्तीचे आयुष्य काळाने नव्हे, तर चेतनेच्या खोलीने वाढते. इंद्रियांवर विजय मिळवला की भय, हानी किंवा पराभव यांना त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गच राहत नाही. तो स्थिर, निर्विकार, अचल होतो.
हीच अचल अवस्था एका नव्या शक्तीला जन्म देते जी मानवाच्या स्वभावापलीकडे असते, इच्छांच्या चढउतारांपलीकडे असते आणि भावनिक आसक्तीच्या अस्थिरतेपलीकडे असते.
कारण आसक्ती म्हणजेच वेदना.
करुणेमध्येही क्रौर्य दडलेले असते.
आणि प्रत्येक सुरुवात ही एका प्रकारच्या अंधारातूनच जन्म घेते.
या साऱ्या पलीकडे एक महान सत्य आहे विश्व असीम आहे, सर्वव्यापी आहे, शाश्वत आहे आणि अंधकारमय खोलीत सुप्त असलेल्या परम सत्याची अभिव्यक्ती आहे.
हे सत्य समजून घेणारा माणूस बदलाला घाबरत नाही.
हे सत्य स्वीकारणारा माणूस वेदनेच्या पलीकडे जातो.
आणि हे सत्य जगणारा माणूस निर्माण-विध्वंसाच्या ब्रह्मनृत्याचा साक्षीदार बनतो.
(*हा लेख असुर या वेब सिरीजने प्रेरित असून, यात मांडलेले विचार माझे स्वतःचे मूळ विचार नाहीत. हा लेख त्या सिरीजमधील विविध संकल्पनांचे संकलन आणि अर्थानुवाद आहे)


Comments
Post a Comment